पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे, नव भारत विकास फाऊंडेशनचे – भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र, (पुणे) आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी (पुणे) आयोजित, ‘एकाच ठिकाणी 8 तासात 892 दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या, प्रमाणपत्र प्रदान सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

8 तासात 892 दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचा विक्रम येथे करण्यात आला, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, याचा मनस्वी आनंद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे अनेक कार्यक्रम पीआर म्हणून करण्यात येतात, पण ‘सेवा हा भाव’ ठेऊन हा उपक्रम करण्यात आला, हे याचे वेगळेपण आहे. सेवेचाच भाव ठेऊन काम करणाऱ्यांसाठी हा थांबा नाही. हा एक विसावा असून, हा प्रवास असाच चालणार आहे. हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीत वैचारिक फरक आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत ‘सर्व्हाव्हयल ऑफ द फिटेस्ट’ची संकल्पना आहे. मात्र आपल्या संस्कृतीत ‘जन्मेल तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ हा विचार आहे. भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सुरु असलेले दिव्यांगांच्या सेवा कार्याचा अभिमान असून, सेवेला समर्पित संघटना निर्माण झाल्यास कार्याची गती वाढते. तीच गती भारत विकास परिषदेमुळे प्राप्त झाली असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या सेवाकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आणि सर्व प्रयोजकांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकलांग शब्दाला दिव्यांग पर्याय दिला. संस्थेनेही आपल्या 25 वर्षांच्या सेवायात्रेत आपले नाव आता ‘भारत विकास परिषद विकलांग’ ऐवजी ‘भारत विकास दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ करावे, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतल्यामुळे जागतिक स्तराचे कृत्रिम अवयव आता भारतात निर्माण होत आहेत, तसेच राज्य शासन संकेतस्थळे ते शासकीय कार्यालये यामध्ये सुगमता आणण्यासाठी व त्यांना दिव्यांगस्नेही बनविण्यासाठी प्रयत्नरत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. सिद्धार्थ शिरोळे, भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारी, कार्यक्रमाचे सर्व प्रायोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.