मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी आवाहन केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या ४८० पदांमध्ये वाढ करावी, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशा मागण्या पवार यांनी केल्या असून त्यासंदर्भात पवार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
यशवंतराव चव्हाण केंद्रात संयुक्त पूर्व परीक्षेच्या (कम्बाइन) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढीच्या मागणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होत असून त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (पीएसआय २१६, एसटीआय २०९, एएसओ ५५) ही जाहिरात तुटपुंजी आहे, अशा प्रकारची मांडणी विद्यार्थ्यांनी पवार यांच्यासमोर केली.
या बैठकीविषयी पवार यांनी एक्सवर माहिती देत, जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून प्रशासनात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने सरकारला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून दूरध्वनीवरूनदेखील संपर्क साधणार आहे, असे सांगितले.