हसुर दुमालात माजी पोलीस पाटलांच्या मुलाची आत्महत्या

म्हालसवडे / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथील तानाजी साताप्पा परीट ( वय ४० ) याने शेतातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी हसुर दुमाला ते राशिवडे बुद्रुक मार्गावरील शेतात शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्याला तात्काळ कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

 

तानाजी परीट याचा कपडे इस्त्री करावयाचा व्यवसाय होता तसेच तो वीज बिल टाकण्याचेही काम करत होता. सोमवारी रात्री घरातून जेऊन तो निघून गेला होता. मंगळवारी सकाळी संजय पाटील या शेतकऱ्याला तो शेतातील झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत निदर्शनास आला. त्यांनीं या घटनेची माहिती साताप्पा परीट यांना दिली. यानंतर त्याला तत्काळ कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. माजी पोलीस पाटील साताप्पा परीट यांचा तो मुलगा होय.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. करवीर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.