सर्वसामान्यांना दिलासा देत, प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आ.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. वैद्यकीय क्षेत्रात ५ वर्षात ७५ हजार जागा भरल्या जाणार आहेत.

 

 

विशेषतः कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर जीवनावाश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शेतकऱ्यासाठी किसान क्रेडीट कार्डची मर्यादा रु.५ लाखांपर्यंत वाढवून कृषि क्षेत्राला चालना देण्यात आली आहे. सर्वसामान्य नोकरदारांना रु.१२ लाखांपर्यंत कर नाही, यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. स्टार्टअपसाठी सरकारच्या १० हजार कोटी रुपयांच्या योगदानातून निधीची व्यवस्था केली जाईल.

पाच लाख महिला, एससी आणि एसटी उद्योजकांना सरकार प्रथमच २ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग मिशन लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना धोरण समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी चालना देईल. आयआयटीची क्षमता वाढवून देशातील ५ IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

तसेच आयआयटी क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार आहे. यातून तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी मदतीव्यतिरिक्त, चामड्याशिवाय पादत्राणांसाठी एक योजना निर्माण करण्यात आली आहे. यातून २२ लाख रोजगार आणि ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि १.१ लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे. विशेषतः या योजनेमुळे “कोल्हापुरी चप्पल” व्यवसायास सुगीचे दिवस येणार आहेत.

त्याचबरोबर सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर १० कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे. एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.