मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच निवडक शहरी भागातील सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण या अभियानांतर्गत करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. कुष्ठरोग शोध अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कुष्ठरोग शोध अभियान दि.३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ कालावधीमध्ये राज्यात निवडक २० जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये याच कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मा. विरेंद्र सिंह, सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सदर अभियानाची राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक दि. २३/०१/२०२५ रोजी मुंबईत मंत्रालयात पार पडली.
अमगोथू श्री रंगा नायक, आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ. अ. मुंबई. डॉ नितीन अंबाडेकर, संचालक आरोग्य सेवा, मुंबई. श्री. शि.म. धुळे, उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, श्री अनिरुध्द कुलकर्णी, अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, श्री प्रशांत डोके, अवर सचिव ग्रामविकास विभाग, मंत्रालय, डॉ. संदिप सांगळे, सहसंचालक, कुष्ठ व क्षय, पुणे, डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आयईसी ब्युरो, पुणे, डॉ. आर. एस. आडकेकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, पुणे, डॉ वि. वि.पै, संचालक बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्ट मुंबई, श्री. व्हिन्सेंट के ए. कार्यक्रम व्यवस्थापक अलर्ट इंडिया,डॉ अमोल शिंदे, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, रा.आ.अ. मुंबई, श्री महेश हंशेट्टी, कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई या बैठकीला उपस्थित होते. डॉ. संदिप सांगळे, सदस्य सचिव तथा सहसंचालक आ.से. (कुष्ठ व क्षय) पुणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कुष्ठरोग शोध अभियान व स्पर्श जनजागृती मोहिमेविषयी उपस्थितांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
राज्यातील सर्व ग्रामीण व निवडक शहरी भागात आणि निवडक जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ७०,७६८ शोध पथके तयार कऱण्यात आली असून, प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी शपथ देण्यात येणार आहे. या निमित्ताने दि. ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कुष्ठरोग आणि त्याचबरोबर क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अन्य शासकीय विभाग तसेच जनजागृती व लोकसहभागाद्वारे राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कुष्ठरोगाविषयी व्यापक लोकजागृती करण्यासाठी दि. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभेमध्ये सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कुष्ठबाधित व्यक्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुष्ठरोगाविषयी जनसामान्यांपर्यंत संदेश पोहचविण्यात येणार आहेत.