जयसिंगपूर : माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी जगेन आणि मरेन, इतके ऋण माझ्यावर शिरोळ तालुक्याने केले आहे. माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी ते तुमचे ऋण फिटले जाणारे नाहीत. माणसाच्या मरणाची चिंतन करणाऱ्यांना मोठेपण प्राप्त होत नाही, तर विचाराने मोठेपण प्राप्त होते. शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना ज्या दृष्टीने शिवसृष्टी जयसिंगपूर शहरात अवतरली त्याच दृष्टीने भीमसृष्टी उभारून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे स्वप्न पूर्ण करणार, अशी ग्वाही महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील सांगता सभेत दिली.
आमदार यड्रावकर विरोधकांचा समाचार घेताना पुढे म्हणाले, कोल्हापूर येथून येऊन जयसिंगपूर शहराचे नेतृत्व करण्याची वलग्ना करणाऱ्यांनी शिरोळ तालुक्यात कर्तुत्वान माणसे नाहीत काय ? असे सांगत हा शिरोळ तालुक्याचा अपमान नव्हे का ? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, कोल्हापुरातून येऊन माझ्या विकास कामावर टीका टिप्पणी करणाऱ्यांनी आपली मान इकडे – तिकडे वळवली असती तर लगत असलेली विकास कामे त्यांना दिसली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. कोल्हापूरचे नेते ज्या पदावर बसले आहेत त्या पदासाठी जयसिंगपूरचेही योगदान आहे ते त्यांनी विसरू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसचे पदाधिकारी मला निवडून देण्यासाठी माझ्याबरोबर काम करत आहेत, हेच माझे मोठेपण आहे, हे त्यांनी समजून घ्यावे. नेत्यांनी कार्यकर्त्यांची किंमत ठेवली तरच कार्यकर्ते नेत्याजवळ येतात, पैशाने कार्यकर्ते जवळ येत नाहीत. शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीसाठी शेतकऱ्यांना एका विशिष्ट बँकेतून १३ टक्के व्याजदराने कर्जे दिली आहेत, तिमाही व्याजदर आकारणी केल्याने वार्षिक दामदुप्पट कर्जाची रक्कम होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावरही आम्ही रामबाण उपाय काढला आहे, जे थकीत कर्जदार आहेत ती कर्जमाफी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून करणार आहे. शासनाच्या क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ८० टक्के अनुदान २० टक्के कर्ज या धोरणानुसार शेतकऱ्यांची शेती क्षारपड मुक्त होणार आहे.
माझे राजकीय गुरु स्व. सा.रे.पाटील यांना एक मंत्र दिला आहे. की विरोधकावर टिका न करता आपल्या कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करा, माझ्या कामाचं मूल्यमापन न करता माझ्यावर टीका टिप्पणी सुरू आहे, मात्र सुज्ञ मतदार हे ओळखून आहेत.
स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी आपल्या नेत्यावर निष्ठा कशी असावी हे दाखवून दिले आहे. चुकीला चूक म्हणण्याचं धाडस त्यांनी केलं आहे. तेही माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी राहीन.
शिरोळ तालुक्यातील कोरोनाच्या काळात केलेले काम, महापूर रोखता यावा यासाठी उचललेले पाऊल आणि शिरोळ तालुक्यातील सर्वांगीण विकास साधत असताना केलेली १ हजार ९०३ कोटींची कामे करीत असताना विकास हाच धर्म मानून मी आज पर्यंत कार्यरत आहे, यापुढेही कार्यरत राहीन, आपण सर्वांनी मला मताच्या रूपातून ताकद द्यावी, असे भावनिक साद व कळकळीचे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
यावेळी बोलताना सावकर मादनाईक म्हणाले, चळवळीचे निर्णय वेगळे आणि राजकारणाचा निर्णय वेगळा असे मी वारंवार राजू शेट्टी यांना सांगत होतो, कुणालाही उभा करून बाद करू नका’ असेही सांगितले होते, पण ते ऐकले नाहीत, शेतकरी हिताचे निर्णय महायुती सरकार घेत आहे, त्यामुळे मी राजू शेट्टी यांच्याबद्दल निष्ठा कायम ठेवन पण शेतकऱ्यांच्या हितासाठी मी महायुती सोबत गेलो आहे. आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील विकासाची गंगा आणली आहे. गेल्या पन्नास वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणालाही बसवता आला नाही, मात्र तो आमदार यड्रावकर यांनी मोठ्या दिमाखात बसवला. लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विकास करणाऱ्या नेत्याला निवडून आणण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी नेहमी हातात दगड घेऊन चालत नाही चर्चेतून मार्ग सुटतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उसाच्या दराचा तोडगा ही चर्चेतून सोडवू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मनीषा डांगे म्हणाल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कामाचे बुकलेट मला कोल्हापूरच्या पत्त्यावर पाठवायचे आहे, ते बुकलेट टीका करणाऱ्या नेत्याने वाचावे, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत जेवढी कामे केली नाहीत, तेवढी कामे आमदार यड्रावकर यांनी फक्त अडीच वर्षात केली आहेत. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी जरा जपून टीका करावी, असा सबुरीचा सल्ला मनीषा डांगे यांनी दिला.
यावेळी विजय भोजे म्हणाले, जयसिंगपूर येथील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केले आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना निलंबन करण्यात आल्याचे जाहीर केले. यापुढे ज्या औलादी आमदार यड्रावकर यांच्या विरोधात जातील, त्यांच्या कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. यावेळी दशरथ काळे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी स्मिता निकम, दिग्विजय माने, भगवंत जांभळे, बबन यादव, रणजीत पाटील, मिलिंद शिंदे, श्रीपती सावंत, राजू चुडाप्पा, बाळासाहेब कांबळे, वर्षा पाटील, रुस्तुम मुजावर, सतीश मलमे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अमरसिंह पाटील, पराग पाटील, रवींद्र ताडे, रामचंद्र डांगे, बाळासाहेब भांदिगरे, प्रमोददादा पाटील, पै. केशव राऊत, मिलिंद भिडे, राजेंद्र नांद्रेकर, मल्लाप्पा चौगुले, संजय शिंदे, माधुरी टाकारे, अस्मा पटेल, अभिजीत भांदिगिरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन…मतदारांना केले आवाहन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयसिंगपूर येथील प्रचार सभेत भ्रमणध्वनी वरून मतदारांची संवाद साधला, ते म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी अविरत झटणारे कर्तृत्ववान, कार्यसम्राट , कर्तबगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भरीव विकास निधीतून शिरोळ तालुक्याचा कायापालट केला आहे, या निवडणुकीत मतदार बंधू आणि भगिनींनो त्यांना इतक्या मतांनी निवडून द्या की, समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाले पाहीजे, असा टोला लगावून ते म्हणाले, हा एकनाथ शिंदे यड्रावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून तालुक्याच्या विकासाची चिंता नको, असे सांगून त्यांनी आमदार यड्रावकर यांना शुभेच्छा दिल्या.