हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करणार- भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा निर्धार

बामणी: येत्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात झालेल्या कागल, गडहिंग्लज व उतूर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघ भाजपा समन्वयक भरत पाटील, कागल तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर मुश्रीफ यांनी आमचा योग्य सन्मान करत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांबाबत सकारात्मकतेची भावना ठेवली. विकास कामे व समिती निवडींमध्ये आम्हाला योग्य न्याय दिला.भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवून कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी दक्ष राहू, भाजपाच्या कार्यकर्त्यांना हयातभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू, सत्तेच्या काळात निधी वाटप व समिती निवडीमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही.तसेच महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ या नात्याने कार्यरत आहे. यामुळे आपण सुद्धा मोठा भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे रहावे.

यावेळी एड. अमर पाटील, मृगेंद्र पाटील, लंकेश पांजळकर, राजू सरनाईक, संजय कांबळे, गडिंग्लज भाजपा महिला पदाधिकारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कागल विधानसभा समन्वयक भरत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार एम. एम. चौगुले यांनी केले.

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुश्रीफांच्या विजयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल असे सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते प्रचारात महायुतीतील घटक पक्षांच्या एक पाऊल पुढे असतील.