नवीन मतदारांना 19 ऑक्टोंबरपर्यंत नोंदणी करता येणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. तर तृथीयपंथी मतदार 183 आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 72 हजार 566 असून सैनिकी मतदारांची संख्या 8 हजार 636 आहेत यामध्ये पुरुष 8 हजार 367 व महिला 269 आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या 27 हजार 120 असून 85 व अधिक वयोगाटातील मतदारांची संख्या 38 हजार 349 आहेत. नवीन मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी. तसेच मतदार यादीमधील नावांमधील दुरुस्ती, नावांचे स्थलांतर सुध्दा या कालावधीमध्ये करता येणार आहे.

 

मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री मतदारांनी करावी

मतदान ओळखपत्र असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार नसून त्याकरिता मतदार यादीत त्या मतदाराचे नांव असणे आवश्यक आहे. मतदानाकरिता आलेल्या मतदाराचे नांव मतदार यादीत असल्यास त्याने एकूण 12 प्रकारचे ओळखीचे दस्तावेज / ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास त्याला मतदान करता येईल. फक्त फोटो वोटरस्लीपच्या आधारावर मतदान करता येत नाही. त्या सोबत मा. आयोगाने निर्देशित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, लोकसंख्या नोंदणी अंतर्गतचे स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेले निवृत्ती विषयक कागदपत्र, छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र, संसद/ विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, युडीआयडी कार्ड या 12 प्रकारच्या ओळखपत्राचा समावेश आहे.

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी कुठल्याही निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर किंवा Voter Helpline या अॅपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते. तसेच मतदार यादीत आपले नाव नसल्यास अथवा तपशिलात काही चूक झाली असल्यास अर्ज करता येईल.