मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली सराटीला गेले. त्यापूर्वी मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. 

“अनेक नेते जातीवाद करायचा नाही म्हणतात, कॅमेरासमोर गोड बोलतात. पण प्रत्यक्षात कृती काहीही होत नाही. तरीही आम्ही मराठा बांधवांना शांत राहण्यास सांगितलं आहे. कोण काय कावे करतं आहे त्यावर बारीक लक्ष ठेवा आणि नंतर तुमची भूमिका मांडा. ४ जूनला आमरण उपोषण सुरु होणार आहे. आपल्याला या नेत्यांमध्ये कोण जिंकलं? कुणाच्या अंगावर गुलाल पडला याचा आनंद नाही. तर आरक्षणाच्या गुलालात आपल्याला रस आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

४ जूनला आम्ही उपोषण करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे उपोषण करणार आहोत. ४ जूनला आंतरवली सराटीतून आम्ही उपोषण सुरु करणार आहोत. आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला कोण पडलं, कोण निवडून आलं याचा आम्हाला आनंद नाही. आमचा बाकी कशात आनंद नाही. ४ जूनची तारीख आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आमचं शांततेचं युद्ध आहे त्याच मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची , ज्या केसेस मागे घ्यायच्या ठरल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, शिंदे समितीचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायचा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. नवीन मागणी कुठलीही नाही. आता सगळा मराठा एकवटला आहे. ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण द्यावं ते झालं नाही तर आंदोलन बंद करणार नाही. कठोर आमरण उपोषण होणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.