कोल्हापूर :
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागाव गावांत येताना
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट शेतात जाऊन भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतीविषयी चर्चा केली.
शेतात उसाची भरणी, भांगलण आदी कामे सुरु होती. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी उसाची भरणी कधी केली, लागण किती महिन्याची आहे, कोणकोणती आंतरपिके घेता, पाण्याची सोय कशी आहे, सेंद्रिय शेती करता काय आदी विषयावर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी शेती करताना खताचे वाढणारे दर, वाढती महागाई, रात्रीचे शेतीला मिळणारे पाणी याबाबत सत्ताधारी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी, शेतकऱ्यांना जी शेती आपण रासायनिक शेती करता त्यातीलच काही भागात सेंद्रिय शेती करून विषमुक्त भाजीपाला, धान्य घेण्याचा प्रयत्न करावा. कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे सेंद्रिय पिकांना चांगला दर मिळत आहे. त्याची मागणी वाढत आहे. यासाठी सामूहिकरित्या प्रयत्नाची गरज आहे असे सांगितले.
शेवटी निघताना युवराज्ञी संयोगिराजे छत्रपती यांनी
शेतकऱ्यांना लोकसभेला शाहू महाराजांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही काँग्रेससोबतच राहणार, आमच्या शाहू महाराजांनाच मतदान करणार असे आवर्जून सांगितले.