कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षाचे होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना उपचारासाठी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सांगली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी (३१ जानेवारी) निधन झाले.
बाबर यांनी चार वेळा आमदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. १९९०, १९९९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवेश झाला. २०१९ मध्ये शिवसेनेतर्फे निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता.
खानापूर तालुक्यातील गार्डी हे त्यांचे जन्मगाव. सात जानेवारी १९५० रोजी त्यांचा जन्म झाला होता. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गार्डीचे सरपंच झाले. सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले.