बालिंगा उपसा केंद्रातील कर्मचाऱ्यानाआ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ‘दिवाळी भेट’

कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर आणि दगडी पाटाचे काम सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील यानी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून जोखमीचे काम करणाऱ्या सर्व ३० कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना दिवाळीची भेट म्हणून पेहराव आणि मिठाई दिली. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यानी काढले.

    बालिंगा येथील उपसा केंद्रातील दगडी पाट आणि चेंबरमध्ये दगड, माती, गाळ पडल्याने भोगावती नदीतून उपसा केंद्राकडे  होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सी आणि डी  वॉर्डमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर मिलिंद कणसे यांच्या माध्यमातून भोसले यारी ग्रुपचे रुपेश भोसले यांच्याकडील ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाटातील दगड माती काढण्याचे काम ३ नोव्हेंबर पासून सुरू केले आहे.  २५० मीटर लांब आणि ५० फूट खोल असलेल्या या दगडी पाटामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सहा दिवस हे काम सुरु केले. 

बुधवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचे आमदार पाटील यानी कौतुक करत सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त मिठाई आणि पेहरावा दिला.जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, कॉन्ट्रॅक्टर मिलिंद कणसे, भोसले यारी ग्रुपचे रुपेश भोसले यांनी या कामाच्या पूर्ततेसाठी अहोरात्र प्रयत्न करून कष्ट घेतल्याबद्दल त्यांचाही सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप दिली. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. गुरुवारपासून कोल्हापूर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, अशी आशा आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, राहुल माने, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, मधुकर रामाणे, दुर्वास कदम यांच्यासह दिग्विजय मगदूम, मयूर पाटील, इजाज नागरगट्टी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.