शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखन महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर : शंभर व पाचशे रुपये मुद्रांक बंद न करता कायमपणे सुरु ठेवावेत व सदरचे मुद्रांक, मुद्रांक विक्रेत्याच्या मार्फत विक्री करण्यात यावी,भविष्यात फ्रंकिंगप्रणाली प्रणाली सुरु करणे आवश्यक असेल तर ही योजना फक्त मुद्रांक विक्रेत्यांच्या मार्फत सुरु करावी. त्यामध्ये बँकेचा समावेश करण्यात येऊ नये यासह अन्य मागण्यासाठी आज शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखन महासंघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी शंभर रुपये व पाचशे रुपये किंमतीचे जनरल मुद्रांक बंद करुन त्याऐवजी फ्रंकिंगप्रणाली शंभर रुपये व पाचशे रुपये किमतीचे मुद्रांक विक्री करण्याची घोषणा केली आहे. ही बाब राज्यातील सुमारे चार हजार मुद्रांक विक्रेत्यांना बेरोजगार करणारी असल्याने, तसेच शंभर रुपये पाचशे रुपये किंमतीचे मुद्रांक बंद झाल्यानंतर, जनतेची मोठी गैरसोय होणार आहे.महसूल मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेच्या विरोधात, राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक महासंघाच्या वतीने संपूर्ण व दस्त लेखनिक महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यांमध्ये एक दिवसांचे लाक्षणिक धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० ऑक्टोबर रोजी करण्यात येत आहे.

शासनाने शंभर रुपये व पाचशे रुपयाचे मुद्रांक विक्री पूर्वत, मुद्रांक विक्रेत्याच्या मार्फत करावी. यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक धरणे आंदोलन करीत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने, जिल्हा मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्या प्रलंबित ठेवले असताना, शंभर रुपये व पाचशे रुपये किमतीचे मुद्रांक बंद करुन राज्यातील ४००० मुद्रांक विक्रेत्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण केला असून ही बाब अत्यंत निंदनीय आहे असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष अशोक कोंडेकर, अशोक सारडा, शंकरराव यादव, नितीन पवार, अशोक ससे, अंजना कानवडे, मेघना पाटील, संध्या पांडव आदी सहभागी झाले होते.