विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय पुणे येथे स्थलांतर करू नये

कोल्हापूर : कोल्हापूर येथे कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या व्यापारी दृष्ट्या असलेले महत्त्व आणि कर्नाटक व गोवा सीमा व कोकणातील गुन्हेगारीवर नियत्रणांसाठी हे कार्यालय कोल्हापुरातच असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरित करू नये अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,
पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यापार उद्योग, व्यवसाय व शिक्षण याबाबतीत कोल्हापूर महत्वाचे केंद्र आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय कार्यरत आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना हे जवळच्या अंतरावर व सोईचे ठिकाण आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाखाच्या आसपास असून कर्नाटक, गोवा राज्य व कोकण विभागाला जोडणारा कोल्हापूर जिल्हा असल्याने कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी सातत्याने होत आहे. असे असतानाच आमदार राहूल कूल यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालय पुणे येथे स्थलांतरीत करणेबाबत मागणी केली असल्याचे समजते.

कोल्हापूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षकाचे कार्यालय हे स्वतंत्र इमारतीमध्ये कार्यरत असून या कार्यालयानजीक सुसज्ज असे पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस अधिक्षक कार्यालय, प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची व पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे गृहविभागांची कामे जलद गतीने व सुरळीतपणे होतात. या कार्यालयामुळे कर्नाटक राज्य सीमा परिसर, गोवा राज्याला जोडणाऱ्या व कोकण नजीकच्या परिसरावरील गुन्हेगारीवर गृहविभागास नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 

तरी गोवा व कर्नाटक राज्य सीमेवरील परिसरावर व कोकण भागातील गुन्हेगारी नियंत्रीत ठेवण्यासाठी व जनतेच्या सोयीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असणारे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचे मुख्यालय कोल्हापूर येथून स्थलांतरीत न करता कोल्हापूरातच कार्यरत ठेवणेत यावे अशी मागणी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आले आहे.