
अडीच एकर पिकाची समाजकंटकांकडून नासधूस
सांगवडेवाडी: करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी येथील शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पिकाची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केली आहे. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी या शेतकऱ्यांची तात्काळ भेट घेऊन त्यांना आधार देत आर्थिक मदतीचा हात दिला.

लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरता यातून मार्ग काढत सांगवडेवाडी येथील चव्हाण कुटुंबाने सुमारे अडीच एकर क्षेत्रात टोमॅटो, कारले व मिरचीची लागवड केली होती. तर संजय खोत यांनी वरणा पिकाची लागवड केली होती. प्रसंगी भांड्यातून पाणी घालून हे पिक वाढवले होते. चव्हाण यांचे सुमारे १५ जणांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. मात्र या शेतकऱ्यानी जीवापाड जपलेले हे पिक रात्री समाजकंटकांनी उपटून टाकून त्याची नासधूस केली. सध्या टोमॅटोला असलेल्या उच्चांकी दर पाहता यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकाची झालेली हि वाताहत पाहून संपूर्ण चव्हाण कुटुंबावर आकाशच कोसळले आहे.
याबाबतची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हादरून गेलेल्या या शेतकरी कुटुंबांना त्यांनी मानसिक आधार दिला. शेताची झालेली ही नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी चव्हाण कुटुंब व खोत कुटुंबाला आमदार पाटील यांनी आर्थिक मदतही दिली.यावेळी शीतल खोत, रामदास माने, धनराज खुडे, सुदर्शन खोचगे, रवी खोत, राजेंद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
