लवकरच लाडकी ‘माधुरी’ पुन्हा नांदणीत येणार; स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची माहिती   भाविकांच्या प्रतीक्षेला अखेर आशेचा किरण

नांदणी:नांदणी मठाशी आणि लाखो भाविकांच्या भावनेशी घट्ट नाळ जोडलेल्या ‘माधुरी’ अर्थात महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग आता अधिक मोकळा झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुढील काही महिन्यात माधुरी पुन्हा नांदणीच्या भूमीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

माधुरीच्या पुनर्वसनासाठी आणि सुरक्षित पुनरागमनासाठी आवश्यक तयारी वेगाने सुरू आहे.त्यासाठी वनताराची तज्ज्ञ टीम नांदणी येथे दाखल झाली असून त्यांनी मठ परिसरातील निवास व्यवस्था, सुरक्षितता, आरोग्यविषयक सुविधा आणि देखभालीच्या सर्व बाबींची सखोल पाहणी केली.नांदणी मठ आणि वनतारा यांच्या संयुक्त विद्यमाने माधुरीच्या वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

जिनसेन संस्थान मठ, नांदणी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना भाविकांना आनंदाची बातमी दिली आहे. माधुरीच्या पुनर्वसन व सुरक्षित पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून,महाराष्ट्र शासन,नांदणी मठ आणि वनतारा यांच्यातील सकारात्मक घडामोडींमुळे तिच्या परतीच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत,असे मठाकडून सांगण्यात आले आहे.२८ जुलै २०२५ रोजी माधुरीला वनतारा येथे हलविण्यात आले होते.त्यावेळी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

अनेक भाविकांनी तिच्या आठवणी सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.आता पुन्हा एकदा माधुरी नांदणीच्या परिसरात वावरताना पाहण्याची आस सर्वांच्या मनात आहे.जिच्यावर लाखो भाविकांचे प्रेम आहे,ती लाडकी माधुरी पुन्हा नांदणीत परतावी,हीच सर्वांची प्रार्थना असून तिच्या पुनरागमनाची बातमी भाविकांसाठी आनंदाचा आणि श्रद्धेच्या विजयाचा क्षण ठरत आहे.

🤙 8080365706