
कोल्हापूर : ज्या -ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार पक्षाने उभा केला. त्या उमेदवाराच्या विरोधी प्रचार करण्याचे काम व्ही. बी. पाटील यांनी सातत्याने केले. त्यांनी आत्ता आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिले आहे.
अशा कुरघोड्यांसंदर्भात आमचे दैवत शरद पवारसाहेब यांनी अनेकवेळा आमच्यासमोरच व्ही. बी. पाटील यांना खडसावलेही आहे, असेही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे, जाहीर सभेच्या निमित्ताने पवार आले कि, त्या दिवशी उपस्थित राहायचे. दुसऱ्या दिवशीपासून विरोधी काम करायचे. अशा संदर्भाने वेळोवेळी, “व्ही. बी. पाटील, तुम्ही बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा करू नका,” असे दस्तूरखुद्द पवार यांनी आमच्यासमोरच त्यांना खडसावले आहे. त्यांनी आता आम्हाला शरद पवारसाहेबांच्या आणि पक्षाच्या निष्ठा शिकवू नयेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. आतापर्यंत त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. यापुढेही न्यायदेवता त्यांना न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून या राज्यात अनेकांनी साखर कारखाने उभा केलेत. यात एकट्या मुश्रीफांचाच काय दोष? पवार यांना देखील ईडीची नोटीस आली होती. त्याबद्दल व्ही. बी. पाटील तुम्हाला काय म्हणायचं आहे?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परवा मुंबई येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचे अनेकवेळा पवार यांच्या बरोबर ठरलेलं गुपितही त्यांनी उघड केलेल आहे. सातत्याने आपल्यालाच व्हिलन करण्यात आले, असाही उच्चारही त्यांनी केलेला होता. यावरून खरी परिस्थिती काय आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व राज्यातील जनतेच्या लक्षात आलेल आहे. म्हणून; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही जिल्ह्यातील बहुतांशी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अजितदादा पवार यांच्या मनात असलेला राज्याचा विकास, महाराष्ट्र राज्य देशात एक नंबरला आणण्याचे स्वप्न आणि राष्ट्रवादीचा विस्तार या दोन गोष्टीसाठी आम्ही प्रामाणिकपणाने अजितदादांना साथ देऊ.
अजितदादांनी मुंबईमध्ये व मुश्रीफ यांनी सत्काराच्या सभेत शरद पवारसाहेब हेच आमचे दैवत आहेत व दैवत राहील, असा खुलासा केलेला आहे. त्याचा मीही पुनरुचार करतो. पवार आमचे दैवत आहेत व दैवत राहतील. मुश्रीफ मंत्री होऊन आल्यानंतर करवीर नगरीत व कागलमध्ये झालेले विराट स्वागत आणि गेले तीन-चार दिवस सर्वसामान्य लोक त्यांना भेटून शुभेच्छा देत आहेत. यावरून जनता या निर्णयाच्या बाजूने आहे, हेच स्पष्ट होते. दरम्यान; व्ही. बी पाटील यांनी यापूर्वीही अनेकवेळा आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांचा द्वेषच केलेला आहे. मुश्रीफ यांच्या द्वेषापोटीच त्यांनी आत्ताही हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. त्याला आमच्या शुभेच्छा असे ते म्हणाले.
