
कोल्हापूर : मोठमोठ्या जाहिराती देऊन कोणाचं कल्याण होत नाही, विकास होत नाही.आयुक्त नसल्याने कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत म्हणून ताबडतोब आयुक्त देण्याची मेहरबानी शासनाने करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे.

यावेळी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिकेला प्रशासक आयुक्त मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना पवार म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या 28 दिवसांपासून कायमस्वरूपी प्रशासक नसल्यामुळे महापालिकेत बेभरोशाचा गलथान कारभार सुरू आहे. यामुळे कोल्हापूर वासिय त्रस्त झाले असून अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात चिकनगुनिया, डेंगू इत्यादी संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. पाण्याचे नियोजन नसल्याने नदीला पाणी असून सुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारक हैराण झाले आहेत. एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिकेत मोठमोठे टेंडर निघाले आहेत ,निविदा निघाल्या आहेत. ठेकेदारांना काम दिल्याशिवाय महापालिकेला आयुक्त देणार नाही का असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी,मंजित माने,शांताराम पाटील,युवराज खंडागळे, विशाल देवकुळे, दत्ताजी टिपूगडे,अवधूत साळोखे,दीपक रेडकर, दीपक गौड,दिनेश साळोखे,किरण पडवळ, स्मिता सावंत, स्वरूपा खुरंदळे, प्रतिज्ञा उतुरे, दीपाली शिंदे, प्रीती क्षीरसागर यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
