
कागल : कागल येथेबी. ओ .टी तत्वावरील राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील पहिलाच सोलार प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.कागल नगरपालिकेच्या प्रस्तावित सोलर प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या वीजबिलात वार्षिक एक कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल. असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावरील या प्रस्तावित प्रकल्पाच्या प्रकल्प स्थळी प्रत्यक्ष भेटीवेळी ते बोलत होते. श्री घाटगे पुढे म्हणाले, सोलर सिस्टिम द्वारे ऊर्जा निर्मितीचा दुरुस्ती देखभालीसह साडेसात कोटी रुपये खर्चाचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. सध्या पालिकेचे वीज बिलावर जवळपास दीड कोटी रुपये वार्षिक खर्च होतात. या पथदर्शी प्रकल्पामुळे पथदिव्यांच्या वीज बिलावर होणारा खर्च वाचणार आहे.हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन नागरिकांना वीज बिलामधे बचत झालेली रक्कम इतर विकास कामावर खर्च करता येणार आहे.या प्रकल्पाचे अभियंता रोहित भोई म्हणाले, या ठिकाणी सौर उर्जेवर तयार झालेली वीज महावितरणच्या जवळच्या केंद्राकडे देऊन त्याद्वारे सध्या कार्यान्वित असलेले यंत्रणेतून वीजपुरवठा होईल. सव्वा मेगावॕट वीज निर्मिती क्षमतेचा सध्याचा प्रकल्प असून भविष्यातील वाढीव विजेच्या मागणीच्या आवश्यकतेनुसार यामध्ये दोन मेगाव्हेट पर्यंत वीज निर्मिती क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. या प्रकल्पाची सुरक्षित चाचणी क्षमता 25 वर्ष असून पंधरा वर्षे कंपनीच्या ताब्यातील हा प्रकल्प नगरपालिकेकडे हस्तांतरित होईल. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक आप्पासो भोसले, दीपक मगर विवेक कुलकर्णी आपासो हूचे, रमिज मुजावर, युवराज पसारे ,पांडुरंग जाधव,बाळू हेगडे,आदी उपस्थित होते.
