
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा उभा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र सरकारने यानुषंगाने आणलेल्या अध्यादेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ.संबंधित अध्यादेश हा राज्यघटना आणि लोकशाहीच्याविरोधात असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल फिरविला असून हे न्यायालयालाच आव्हान दिल्यासारखे असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले. केंद्राचा अध्यादेश हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून विरोधी पक्षांनी याबाबतचे विधेयक राज्यसभेच्या आडवळणाने मंजूर होऊ देता कामा नये. यासाठी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
