
कोल्हापूर : गोकुळच्या अध्यक्षपदावरून दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरुन अजूनही उलट – सुलट चर्चा सुरुच आहेत. त्यांचा राजीनामा गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरही करण्यात आला आहे. तरीही चर्चा सुरुच असल्याने विश्वास पाटील यांनी स्वत: यावरुन खुलासा देत या चर्चांना ब्रेक लावला आहे.

गोकुळ लेखापरीक्षण सुरु असतानाच राजीनामा आल्याने चर्चेला अधिक उधाण आले आहे. त्यामुळे विश्वास पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गोकुळ लेखापरीक्षण हे राजकीय हेतून केलं जात असून यामध्ये कोणतंही तथ्य नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्हा उत्पादक दूध संघाची 2550 कोटी वरुन 3420 कोटी रुपयांवर उलाढाल गेली आहे. त्यामुळे 870 कोटी रुपयांची वाढीव उलाढाल झाली असल्याच त्यांनी यावेळी स्पष्ट केल.दोन वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांना सात वेळा दरवाढ दिली आहे. जवळपास 20 नवीन बाबी केल्याचा आपल्याला आनंद असून गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणात कोणतेही तथ्य नसून राजकीय द्वेषातून विरोधक हे सर्व करत आहेत ,अशी टीका त्यांनी केली.
