
कोल्हापूर : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपला बी आर एस हा पक्ष महाराष्ट्रात लाँच करत आहेत. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी नांदेड येथे मोठा मेळावा आयोजित केलेला आहे.या मेळाव्यात अनेक नेते व संघटनांचे त्यांच्या पक्षाला समर्थन मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी के. सी. आर यांची त्यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार, के सी आर यांनी छत्रपती संभाजीराजे यांना स्नेहभोजनासाठी विशेष निमंत्रित केले होते. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली. छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यात नवा राजकीय पर्याय उभा करीत आहेत.

तसेच के सी आर हेदेखील महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणात येऊ पाहत आहेत. के सी आर यांचा चेहरा महाराष्ट्रात नवा असून इथे आपले पाय रोवण्यासाठी त्यांना राज्यातील सर्वपरिचित, प्रभावी व स्वच्छ चेहरा आवश्यक आहे. यासाठी ते संभाजीराजे यांच्याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच के सी आर यांचा पक्ष छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेशी युती करून देखील राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो. असे झाल्यास राज्याचा राजकारणात एके नवे समीकरण जुळवले जाऊ शकते. यामुळे प्रस्थापित सर्वच पक्षांना चांगलाच हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
