
कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. ही निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याची मुदत 30 दिवसांची आहे. जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीकरीता निवडणूक लढविलेल्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारी 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन महसूल विभागाचे प्रभारी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रितीने निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यात जे ग्रामपंचायत उमेदवार कसूर करतील त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये पुढील पाच वर्षासाठी अपात्र करण्याची तरतूद आहे. सर्व ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर करावा, असेही आवाहन कांबळे यांनी केले आहे.
