
राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठीत समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपआयुक्त (सायबर शाखा), पोलीस उपआयुक्त (वाहतूक), पोलीस उपआयुक्त (गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने 7 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.
