
कागल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे .देशातील आणि महाराष्ट्रातील परिवर्तनाची जन्मभूमी म्हणून कोल्हापूरची “शाहू भूमी ” ओळखली जाते. त्याअनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भाजपा हा एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपा च्या आणखी मजबुती करणासाठी 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा! असे आवाहन केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कागल येथे आयोजित केलेल्या बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख व शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
नामदार सिंधिया पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडे कोणतीही दूरदृष्टी नाही, त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करत सुटले आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आताच फार मोठा पुळका आला असल्याचे नमूद करून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे , देशाचे दैवत नाही तर ते संपूर्ण विश्वाचे दैवत असुन त्यांच्या कर्तृत्वाचा जागर संपूर्ण विश्वात निर्माण करण्याचा ध्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचे सांगितले.
आज सकाळी येथील बस स्टॅण्ड समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन मंदिराच्या हॉलमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन डॉक्टर, इंजिनियर्स, वकील उद्योगपती ,व्यापारी व नव मतदार यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला .
स्वागत पर भाषणात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले की, नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांची कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही मतदार संघाच्या प्रभारीपदी झालेली निवड हा आमच्यासाठी दुग्ध- शर्करा योग मानावा लागेल . येथील पंचतारांकित एमआयडीसीत अत्यंत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत.सहाजिकच स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यास अडचणी येत आहेत .त्यामुळे तत्काळ आपण या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती श्री. घाटगे यांनी नाम. सिंधिया यांना केली. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की 2019 च्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांना कमळाची साथ नव्हती . त्यावेळी कदाचित त्यांना कमळाची साथ मिळाली असती तर आज निकाल वेगळा दिसला असता . मात्र येत्या काळात मतदार संघातील त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ नवोदिता घाटगे यांचा जनसंपर्क आणि कामाचा सपाटा पाहता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेंना फारशी अडचण नाही असा आत्मविश्वास खास.महाडीक यांनी व्यक्त केला. माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले की केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत व जनमांनसापर्यंत पोहोचविण्यासाठी बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांनी सज्ज राहावे.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, बाळासो पाटील ,बिद्री कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीत पाटील ,राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे , बाबा देसाई, हिंदुराव शेळके ,अशोक चराटी, रमेश माळी,राहुल् देसाई,उपस्थित होते.आभार कारखान्याचे संचालक संजय पाटील यांनी मानले.
चौकट :-
*भारत 2030 पर्यंत जपान, जर्मनीला मागे टाकेल……* गेल्या आठ वर्षात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे . त्याचे फलित म्हणजे आज जगात पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास आलेला आहे. पंतप्रधान मोदी यांची देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याची आगामी काळातील ध्येयधोरणे पाहता भारत 2030 पर्यंत जपान आणि जर्मनी यांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल असा आत्मविश्वास नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला.
