कोल्हापूर: सरनोबतवाडी ब्रीज ते छत्रपती शिवाजी विद्यापीठ पर्यतचा रस्ता दुरूस्ती करावा तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी भाजपा ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सरनोबतवाडी ब्रीज ते राजाराम तलाव येथून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये- जा- होत असते. या पावसाळ्यामध्ये सदर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच राजाराम तलावातील पाणी ओढ्याच्या रूपाने रस्त्यावरून जाते. सदर रस्त्यावर जिवितहानी होण्याअगोदर रस्ता दुरूस्त करून घेण्यात यावा. तसेच सदर रस्त्यावर लाईटची सोय नसल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. तरी रस्त्याची डागडुजी करून व त्या रस्त्याला स्ट्रीट लाईटची सोय लवकरात लवकर करावी.
निवेदनावर सरनोबतवाडी ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी तसेच भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपेश परीट व ओमकार शिंदे आदींच्या सह्या आहेत.