कृषी विक्रीत्यांचे परवान्याचे नूतनीकरण आणि सुधारणा करण्याचे आह्वान

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके विक्रीचे डिजीटल स्वाक्षरी असलेले परवाने प्राप्त करण्यासाठी यापुढे नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे. सदरचे परवाने जुन्या प्रणालीमधून देण्याचे बंद करण्यात आलेले आहे. ‘महाआयटी’ च्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी श्रीरंग जगताप यांनी केले आहे.

या प्रक्रियेत विक्रेत्यांना घरबसल्या नोंदणी करून परवाना प्राप्त करून घेता येणे शक्य होणार आहे. मात्र यासाठी परवाना धारकांना त्यांचा सद्यस्थितीतील वैध परवाना नवीन प्रणालीवर कार्यान्वित करावा लागणार आहे. ज्या विक्रेत्यांच्या परवान्याची मुदत 31 जूलैच्या पुढे आहे, त्यांनी देखील या नव्याने विकसित झालेल्या ऑनलाईन प्रणालीवर आपला परवाना अद्ययावत करावयाचा आहे. परवाना अद्ययावत करण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क भरण्याची गरज नाही. तसे न केल्यास आपला सद्यस्थितीतील परवाना रद्द समजण्यात येईल आणि त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही जगताप यांनी आपल्या पत्रकात म्हटले.