‘या’ दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून रामदास कदम यांच्या पक्षाच्या विरोधी कारवाया सुरु होत्या. त्यामुळे त्यांच्यावर पक्षनेतृत्वावर नाराज होते. रामदास कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांचीदेखील शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आनंद अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आज आदेश दिले आहेत.