शिवसेनेकडून कोल्हापुरात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कोल्हापूर : शिवसेनेत सुरु घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक सुनील मोदी आणि माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शहरप्रमुख म्हणून सुनील मोदी मोदी यांच्याकडे तर रविकिरण इंगवले यांची कोल्हापूर दक्षिण शहर विधानसभा शहरप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तर हर्षल सुर्वे यांच्याकडे शहर समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहर संघटकपदी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे (कोल्हापूर उत्तर विधानसभा) व प्रीती क्षीरसागर (कोल्हापूर दक्षिण विधानसभा) यांची नियुक्ती केली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी पोपट दांगट (कोल्हापूर दक्षिण विधानसभा, जिल्हा परिषद-उचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडी), अवधूत साळोखे (कोल्हापूर दक्षिण विधानसभा, जिल्हा परिषद- पाचगाव, निगवेखालसा, गोकुळ शिरगाव) यांची नियुक्ती केली आहे.