राजेश क्षीरसागर यांची पोस्टर्स फाडली

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेना पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, च्या घोषणा देत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले व रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर यांचे फोटो असलेले शिवसैनिकांनी पोस्टर्स फाडली.

रविकिरण इंगवले म्हणाले, क्षीरसागर यांनी पक्षाच्या नावावर जोगवा मागून त्यांना पक्षाने मंत्रीपद दिले, कार्यालय दिले, वैभव दिले. इतके सर्व देवूनही बकासूर राक्षसासारखी भूक असणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी गद्दारी केली आहे. त्यांचा अहंकार जिरवू व पक्षाच्या नावावर गब्बर झालेल्या पितापुत्रांना धडा शिकवू, असा इशारा दिला.

राजेश क्षीरसागर यांनी जबरदस्तीने व पक्षाच्या बदनामीचा जराही विचार न करता नगरपालिकेची जागा बळकावून विभागीय कार्यालयाच्या नावाखाली शिवाजी पेठेत पक्षाच्या नावाने जे टेंडर कार्यालय काढले होते. त्यावरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो असलेले फलक रविकिरण इंगवले यांनी शिवसैनिकांना फाडावयास लावले.