इचलकरंजी : येथील पालिकेच्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीच्या प्रश्नाचा मोठा गुंता निर्माण झाला होता. मात्र आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत महत्वपूर्ण निर्णय झाला. सन २०१७ मध्ये त्रिसदस्यीय समितीने केलेल्या भाडेवाढीचे फेरनिर्धारण करण्याचे आदेश तनपुरे यांनी दिले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला. या निर्णयामुळे भाडेवाढीमध्ये मोठी कपात होण्याची आशा निर्माण झाली असून गाळेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील विविध भागात पालिकेच्या मालकीची व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेल्या दुकान गाळे भाडे तत्वावर दिली आहे. सन २०१७ मध्ये या दुकान गाळ्यांची त्री सदस्याय समितीने भाडेवाढ व अनामत वाढ सुचवली. पण ही भाडेवाढ पाच ते आठ पट वाढविण्यात आली. त्यामुळे गाळेधारक अडचणीत आले. दुसरीकडे पालिकेने सुधारीत दराप्रमाणे भाडेवाढ न भरल्यास तीन वर्षानंतर दुुकान गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली.
याबाबत दुकानगाळे धारकांनी पालिकेसमोर आंदोलन केल्यानंतर पेच निर्माण झाला. याबाबत मदन कारंडे यांनी मध्यस्थी करीत मंत्रालयात बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सकाळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या उपस्थीतीत बैठक झाली. त्यावर सविस्तर चर्चा झाली.
त्रिस्तरीय समितीने केलेली भाडेवाढ ही कशी अव्यवहार्य आहे, याबाबत कारंडे यांच्यासह गाळेधारक कृती समितीने यावेळी पटवून दिले. भरमसाट वाढ केल्यामुळे ही भाडेवाढ कोणालाच परवडणार नाही, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे सुधारीत भाडेवाढीची पडताळणी करावी व योग्य भाडेवाडीची मागणी केली. तर पालिका प्रशासनाच्यावतीने संबंधित अधिकारी वर्गाने भूमिका मांडली.
मंत्री तनपूरे यांनी सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतर त्रिसदस्यीय समितीने सुचविलेल्या सुधारीत दरवाढीचे तातडीने फेर निर्धारण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. यामुळे याप्रश्नी दुकान गाळेधारकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
बैठकीस मदन कारंडे यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, मिळकत व्यवस्थापक सचीन पाटील, श्रीकांत पाटील, नगर विकास विभागाचे अधिकारी मोघे यांच्यासह दुकान गाळेधारक कृती समितीचे प्रताप होगाडे, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगरसेवक राहूल खंजीरे, विठ्ठल चोपडे, अमित गाताडे, गाळेधारक जोतीराम साळुंखे,रणजीत आबाळे, स्वरूप कुडाळकर, ओमप्रकाश धूत, श्रीकांत कलाल, अमित बीयाणी, विकी काबरा उपस्थित होते.