मुंबई : राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पत्रातून दिला आहे.
राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सर्व देशबांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरूंगात डांबलं, कशासाठी?, ध्वनिप्रूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी, असं राज ठाकरेंनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.