सरुड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील बजागेवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथील वळणावर भरधाव बजाज पल्सर घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. ऋतुराज सुनील कुंभार (वय २७, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा) आणि युवराज पांडुरंग कुंभार (वय ३६, रा. ओकोली, ता. शाहूवाडी ) अशी त्यांची नावे आहेत.
रविवारी दुपारी 3 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ऐन उमेदीतील दोन्ही तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. ऋतुराज हा विद्युत वितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कामाला होता. तर युवराज शेती करत होता. बोरपाडळे येथील नातेवाईक ऋतुराजच्या घरी रविवारी दुपारी जेवण करून युवराज आणि ऋतुराज पल्सर दुचाकीवरून शाहूवाडीकडे निघाले होते. बांबवडे ते शाहूवाडी दरम्यान बजागेवाडी फाटा नजिक रस्त्यावर पडलेल्या नारळामुळे दुचाकीवरील ताबा सुटला आणि गाडी वेगाने घसरून दोघेही रस्त्यावर जोरात आदळले. सुमारे पंचवीस ते तीस फूट गाडीसह फरपटत गेल्याने दोन्ही तरुणांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अपघाताची शाहूवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.