कोल्हापूरची अनुष्का पाटील भारतीय संघात

नवी दिल्ली : जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटीलची भारतीय संघात निवड झाली आहे.

 प्रथमच मुलींच्यासाठी नॅशनल रायफल असोसिएशनने २५ मीटर स्टॅंडर्ड पिस्तल या खेळ प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा भोपाळ (मध्यप्रदेश) येथे घेतल्या. अनुष्काने या निवड चाचणीत अनुक्रमे ५५१ व ५४८ गुण मिळवत एकूण १०९९ गुणांची कमाई केली. अनुष्का पाटीलने चमकदार कामगिरी करत भारतीय संघाच्या प्रथम पाच मुलींमध्ये आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धा ९ ते २० मे या कालावधीत जर्मनीतील सूल येथे होणार आहेत.

 या निवडीबद्दल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवछत्रपती क्रीडापीठाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अनुष्काचे अभिनंदन केले. अनुष्का ही क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू आहे.