कोल्हापूर : आजवर नेते सांगायचे आणि मतदार ऐकायचे, अशी स्थिती होती. पण कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत जनतेने निर्धार केला आहे. शिवाजी पेठेतून भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. आजचा भाजपचा मेळावा पाहूनच विरोधकांनी आपला पराभव मान्य करावा, असे प्रतिपादन माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी केले.
शिवाजी पेठेत आयोजित केलेल्या भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कोल्हापूरच्या गादीचा अवमान केल्याचे सांगत, या राज्यातील परिवर्तनाची सुरवात शिवाजी पेठेतून करण्याचं आवाहन केले.
या मेळाव्यात शिवाजी पेठेतील अनेक संस्था आणि मंडळांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. शिवाजी पेठेतील नागरिकांनी एकत्र येवून गुरूवारी सायंकाळी आयोजित केलेल्या भाजपच्या प्रचार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाजी मंदिरात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात शिवाजी पेठेतील विविध संस्था आणि मंडळांच्या पदाधिकार्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच शिवाजी पेठेत जे होते तेच कोल्हापुरात घडते आणि कोल्हापुरात जे घडते, तेच राज्यात घडते. त्यामुळे राज्यातील सत्तेच्या परिवर्तनाची सुरूवात शिवाजी पेठेतून होईल, अशी ग्वाही अनेक वक्त्यांनी दिली. शिवाजी पेठेतील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे एकत्र येवून कोल्हापूर उत्तरच्या निवडणूकीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार केल्याचे माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी सांगितले. आता जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली असून, मतदार आता कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत. शिवाजी पेठेतील मतदार भाजपला दणदणीत विजय मिळवून देतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
माजी महापौर सुनिल कदम यांनी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या घोटाळयांचा पाढाच वाचला. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरची जनता पालकमंत्र्यांना जाब विचारेल आणि त्यांची जागा दाखवून देईन, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सत्यजितनाना कदम यांना विजयी केल्याशिवाय शिवाजी पेठ स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून, पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. खासदार संभाजीराजे यांना दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करणार्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरूणांनी परिवर्तन घडवावे, असे आवाहन घाटगे यांनी केले.
यावेळी जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महेश उरसाल, अजिंक्य चव्हाण, अशोक देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं. मेळाव्याला शिरीष भोसले, प्रताप देसाई, तुकाराम इंगवले, सुदर्शन सावंत, कुलदिप गायकवाड, विश्वास पाटील, विजय खाडे, गिरीष साळोखे, उदय भोसले, संग्राम निकम, अक्षय मोरे, प्रकाश सरनाईक, गायत्री राऊत, सरिता हारूगले यांच्यासह शिवाजी पेठेतील प्रमुख मंडळं, संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.