कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एस टी कर्मचार्यांच्या कुटूंबियांना उपासमारीच्या खाईत ढकलणार्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करून एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पाठींबा जाहीर केला.
कोल्हापूर शहरात एस टी कर्मचार्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना पाठींबा देण्याचा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी एस टी कर्मचार्यांचे गेल्या चार महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारकडून एस टी कर्मचार्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, आज कोल्हापुरातील एस टी कर्मचार्यांनी मेळावा घेतला. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम, आमदार संजय केळकर, माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गणेश ताटे, अमित कदम, अविनाश मोहिते, प्रेमानंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.
या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. एस टी कर्मचार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही धनंजय महाडिक यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारने एस टी कर्मचार्यांच्या तोंडाला केवळ आश्वासनांची पाने पुसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. तर एस टी कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबीयांना झालेला त्रास मतपेटीतून दिसून येईल, असे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पाठींबा देवून, भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ठरावही या मेळाव्यात करण्यात आला.
यावेळी संजय घाटगे, संतोष शिंदे, विजय पाटील, कुबेर वासुदेव, जोतिबा पाटील, महेश शेळके यांच्यासह एसटी कर्मचारी उपस्थित होते.