कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.कोल्हापूर या बँकेच्या अध्यक्षपदी स्मिता डिग्रजे यांची निवड करण्यात आली. आज गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपद निवडीचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या सभागृहात सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी स्मिता डिग्रजे यांचे नाव संभाजी बापट यांनी सुचविले तर त्यास गणपती पाटील ( जी.एस.) यांनी अनुमोदन दिले. शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच महिला संचालिका यांना अध्यक्ष होण्याची संधी देण्यात आली. बँकेचे नेते व माजी अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्यासह सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ही अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी नुतन अध्यक्षा डिग्रजे यांनी बँकेचे नेते राजाराम वरुटे व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. यावेळी डिग्रजे म्हणाल्या अध्यक्ष पदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. सभासदांना लाभांश मिळावा यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने आपला कारभार राहील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील तसेच सभासद कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.
सदर सभेस माजी अध्यक्ष अरुण पाटील, विद्यमान उपाध्यक्ष बजरंग लगारे, संचालक संभाजी बापट, राजमोहन पाटील, नामदेव रेपे, शिवाजी पाटील, साहेब शेख, जी. एस. पाटील, दिलीप पाटील, प्रशांतकुमार पोतदार, आण्णासो शिरगावे, बाजीराव कांबळे तसेच बँकेचे सुकाणू समिती सदस्य दा. शं. सुतार, शिवाजी पाटील, राजाराम वरुटे, दिलीप बच्चे, पी. के. पाटील, वसंत जोशीलकर, रविंद्र नागटिळे, राजू जुगळे उपस्थित होते. आभार जिल्हा सरचिटणीस उत्तम सुतार यांनी मानले.