इचलकरंजीत राष्ट्र सेवा दल, अंनिसची पर्यावरणपूरक होळी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील गांधी विकासनगर परिसरामध्ये अंधश्रद्धा, जुनाट विचारांना फाटा देत पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली. याचे संयोजन राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी यांच्यावतीने करण्यात आले.

        उपस्थित समूहासमोर गाणी, गप्पा, गोष्टी या माध्यमांतून रोहित वनिता गजानन यांनी होळीविषयी संवाद साधला. होळीमध्ये जाळल्या जाणाऱ्या शेणी, पोळ्या न जाळता त्या आवश्यक ठिकाणी गरजूंना द्याव्यात थोडक्यात “होळी लहान करा, पोळी दान करा” असा संदेशही दिला गेला. उपस्थितांनी मैदानावरचा कचरा गोळा करून त्यातील थोडा कचरा प्रातिनिधिक स्वरूपात जाळण्यात आला. यावेळी मुलांचा हातामध्ये द्वेष, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, विषमता, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार अशा दुर्गुणांच्या आशयाचे काही कागद देऊन त्यांचेही दहन करण्यात आले. होळी दहन करताना काडेपेटीचा वापर न करता मंत्राच्या सहाय्याने होळी पेटवत वैज्ञानिक चमत्कार सादरीकरण विनायक चव्हाण यांनी केले.

        स्वागत सौरभ संतोषी अविनाश यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल माळी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पवन होदलूर यांनी केले. या कार्यक्रमासाठी एस. एन. पाटील सर, उषा कोष्टी, अक्षय कांबळे, आरीफ पानारी, दामोदर कोळी, आरजू पानारी, श्रेयश बदडे, आदित्य धनवडे, ऋतिक बनसोडे आदींसह साथी उपस्थित होते.