कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात पुढाकार घेतला आहे. यासाठी इतर २२ वैद्यकीय संघटनाही यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याबाबत आयएमए कोल्हापूरसह विविध वैद्यकीय संघटनांची आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नुकतीच बैठक झाली.
कोल्हापूर हे वैद्यकीय पर्यटनासाठी कसे विकसित करता येईल यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली. दृकश्राव्य माध्यमाद्वारे सध्या कोल्हापुरात कोणत्या उपचार पद्धती व यंत्रणा उपलब्ध आहेत याची माहिती देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत हॉस्पिटलमध्ये परदेशातील उपचारपद्धती प्रमाणे तितक्याच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त अद्ययावत उपचार यंत्रणा आपल्या इथे उपलब्ध असून त्यांचा खर्चही माफक आहे. तात्काळ उपचार, थ्रीडी निदान यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ व उच्चशिक्षित डॉक्टर्स, गुणवत्तापूर्वक उपचार पद्धती व कमी खर्चात उपचार यामुळे कोल्हापूर जिल्हा हा निश्चितच वैद्यकीय पर्यटनास अनुकूल आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही इथे अधिक आहे. त्यामुळे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अफगाणिस्तान व इतर बऱ्याच देशातून रुग्णांनी कोल्हापुरात उपचारासाठी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडे काय आहे यापेक्षा रुग्णाची गरज किंवा ते काय शोधतात हे पाहून त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्र विकसित केले तर कोल्हापूर हे वैद्यकीय केंद्र नक्कीच बनेल. सर्व हॉस्पिटल्सनी डिजिटल नोंदणी पूर्ण केली आहे. शासन कडून योग्य त्या पद्धतीचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा बैठकीस उपस्थित असलेल्या डॉक्टर व्यक्त केली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासनाकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. विमानतळाचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटनास चालना मिळावी यासाठी शासन प्रयत्न करेल. त्या त्या देशातील दूतावासाची पत्रव्यवहार करेल. वैद्यकीय वारसा मिळण्यासाठी व तो जपण्यासाठी शासन नक्कीच सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. या बैठकीसाठी विशेष करून के. एम. ए. चे माजी अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे पुढाकार घेतला होता.
यावेळी डॉ. गीता पिल्लाई, डॉ. किरण दोशी, डॉ. पी.एम.चौगुले, डॉ. संतोष प्रभू, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ.ए.बी.पाटील, डॉ. महादेव मिठारी, डॉक्टर बी.डी.पाटील, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. संजय देसाई, डॉ. सुनील पाटील, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. रचना संपतकुमार, डॉ.अद्वैत आफळे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. संतोष निंबाळकर, डॉ. आनंद कामत, डॉ.मंदार जोगळेकर,गीता आवटी महेश पटवर्धन आदी उपस्थित होते.