कोल्हापूर : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्ष म्हणून स्नातकांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके म्हणाले, नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान करतात.
शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांनी सादर केला.
तत्पूर्वी, कुलगुरु कार्यालय ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत दीक्षान्त मिरवणुकीने समारंभास प्रारंभ झाला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांनी हाती ज्ञानदंड घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीत कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता सहभागी झाले. कुलगुरु डॉ. शिर्के यांनी स्वागत केले, तर प्र-कुलगुरु डॉ. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा संचालक पळसे यांनी दीक्षान्त समारंभात प्रदान करावयाच्या पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रांचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. तृप्ती करेकट्टी आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.