खुपिरे : गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका अमर उर्फ अमृत पाटील यांच्या निधीतून खुपिरे प्राथमिक शाळा इमारतीच्या खोल्यांसाठी भरघोस निधीची उपलब्धता करू, असे अभिवचन सामाजिक कार्यकर्ते अमर उर्फ अमृत पाटील (शिंगणापूरकर) यांनी दिले.
सौ. रसिका अमर उर्फ अमृत पाटील यांच्या निधीतून सात लाख तरतुदीच्या खुपिरे प्राथमिक शाळा इमारत दुरुस्तीचा प्रारंभ अमर उर्फ अमृत पाटील यांच्या हस्ते आज झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ दिपाली रमेश जांभळे होत्या.
खुपिरे गावाशी आपले वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सुमारे दहा हजार लोकसंख्या व साडेसहा हजार मतदार असलेल्या खुपिरे गावात यापुढे विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, “असेही श्री. पाटील यांनी सांगितले. श्री. पाटील यांच्यासह गावातील मान्यवरांच्या हस्ते शाळा इमारत दुरुस्ती कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.
निधी मंजूर केल्याबद्दल पाटील यांचा ग्रामपंचायत व विद्या मंदिर खुपिरे यांच्या संयुक्त विद्यमाने यथोचित सत्कार झाला. सरपंच सौ. दिपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील, माजी सरपंच संजय डी. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव हराळे, सुभाना निकम यांची समयोचित भाषणे झाली. आनंदा कृष्णा पाटील, दिलीप पाटील, सनी पाटील, सचिन पाटील, न्यूज मराठी 24 या यु ट्युब वाहिनीचे मुख्य संपादक दत्तात्रय बोरगे, आकाराम पाटील सर, दत्तात्रय तुकाराम पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील स्थानिक संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
खुपिरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली पाटील व शिक्षकांनी संयोजन केले. जे. डी. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमिला माने यांनी आभार मानले.