कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यूचे दाखलेही आता मिळणार आहेत. १ डिसेंबर २०२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिका आणि नगरपालिकांवरील दाखले देण्याचा ताण यामुळे कमी होणार आहे.सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यू झाला असल्यास असे दाखले आता सरकारी रुग्णालयात मिळणार आहे.
यापूर्वी हे दाखले मिळविण्यासाठी नगरपालिका आणि महापालिकेत हेलपाटे मारायला लागत होते.आता मात्र सरकारी रुग्णालयातच हे दाखले मिळणार आहे. केंद्र आणि राज्यसरकारने त्यासंदर्भात निबंधकाचे अधिकार रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आणि दाखले हा महत्त्वाचा सरकारी अभिलेख आहे. त्यामुळे या नोंदी करणे आणि त्याप्रमाणे दाखले देणे ही प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत आणि महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थामधून त्यासाठी स्वतंत्र विभाग केला आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत आणि महापालिका हद्दीत असणाऱ्या प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयातील जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करून त्याप्रमाणे संबंधितांना दाखले देणे ही या संस्थेची जबाबदारी आहे.