आजरा : दुचाकीवरील ताबा सुटुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृत झालेल्या तरुणाचे महिन्याभरापुर्वीच लग्न झाले होते. अंगावरील लग्नाची हळद निघण्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाल्याने अर्जुनवाडी (ता.गडहिंग्लज) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीधर रामचंद्र मंडलिक (वय-२८) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
आजरा तालुक्यातील गजरगाव बंधाऱ्यावर हा अपघात झाला. प्रसंगावधान राखत गाडीवरील श्रीधरच्या मित्राने उडी मारल्याने तो बचवला.याबाबत माहिती अशी की, श्रीधर आज आपला मित्र आकाश सुतार याच्यासोबत इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील आत्याला भेटण्यासाठी निघाला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो हारुरमधून गजरगाव बंधाऱ्याकडे जात असताना दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला.यावेळी गाडी रस्त्याच्या कडेला पडली. तर श्रीधर गाडीवरून उडून बंधाऱ्याच्या खाली असणाऱ्या दगडावर जाऊन आदळला. श्रीधरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.