सातारा : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे.
दरम्यान, कोल्हापुरात या पथकाने तपासणी करून हांजे याला चौकशीसाठी कऱ्हाडला बोलावले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील काही दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळले. हे अवशेष वन विभागाने जप्त केल्यानंतर त्याचा पुरवठा कोल्हापूर येथील आयुर्वेदिक औषध विक्री करणारे बावडेकर यांनी केल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने बावडेकर दुकानाची झडती घेतली तेव्हा वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर वन विभागाने बावडेकर यांची दुकाने काही महिने बंद करण्याचे आदेश दिले होते.सातारा, सांगली आणि कोल्हापूर, अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये या कारवाईची व्याप्ती असल्यामुळे वन विभागाच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली. या टीमचे प्रमुख साताऱ्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते आहेत. यात कोल्हापूरचे वन्यजीवचे विभागाीय वनअधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यांचा समावेश आहे.याच पथकातील सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे गुरुवारी कोल्हापुरात अचल हांजे याच्या चौकशीसाठी कोल्हापुरात गेले होते. येथे हांजेची कसून चौकशी केल्यानंतर पुढील अधिक तपासासाठी सोमवार, दि.३१ जानेवारीला कऱ्हाड येथे बोलविण्यात आले आहे.