पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण अपेक्षित आहे.देशाच्या उत्तर भागात सध्या पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत असून उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला आहे. परिणामी राज्यातील थंडी देखील कमी झालेली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवारी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.