गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान १२ संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे संचालकपदाचे राजीनामे दिले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत संचालकांनी आपले राजीनामे दिले.
या घटनेमुळे गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विरोधी आघाडीचे डॉ. शहापूरकर, चव्हाण सत्ताधारी आघाडीचे सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे यांच्यासह १२ संचालकांनी राजीनामे दिले. संचालक मंडळ अल्पमतात आल्यामुळे कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. तर, कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होणार आहेत. ६ वर्षांपूर्वी तत्कालिन आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, श्रीपतराव शिंदे, संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी, तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील, संजय घाटगे, प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काळभैरी शेतकरी विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात तिरंगी चुरशीची लढत झाली होती. त्यात शेतकरी आघाडीला ११ तर काळभैरी आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या.२०१३ मध्ये १० वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर कारखाना चालवायला घेतलेल्या ‘ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी’ने ९ महिन्यांपूर्वी कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडला. त्यामुळे अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी स्वबळावर कारखाना सुरू केला आहे. दरम्यान, त्यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करुन १२ संचालकांनी वेगळी भूमिका घेतली होती.