बारामती – कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही प्रकारचे बेड वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश दिले होते. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालये मंजूर केली, त्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिकांच्या रुग्णालयातही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन निधीपैकी तीस टक्के निधी या कामांसाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.