पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा, अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात जनसागर

कोल्हापूरमहाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी बुधवारी सकाळपासूनच नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी, राजकीय नेते, उद्योजक, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली. ‘डी. वाय. दादा’ या नावाने सर्वांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापुरात अक्षरशः जनसागर लोटला.

 

 

 

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, वनमंत्री गणेश नाईक, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमित देशमुख, आमदार जयंत पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, आमदार अशोकराव माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, फेन्सिंग कॉन्फेडरेशन ऑफ एशियाचे महासचिव राजीव मेहता यांच्यासह शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही डॉ. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

‘डी. वाय. दादांच्या जाण्याने बहुजन समाजाचे न भरून येणारे नुकसान’

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने केवळ एका क्षेत्राची नव्हे, तर संपूर्ण समाजाची अपरिमित हानी झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे बहुजन समाजातील हजारो मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. आज त्यातील अनेकजण विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. मनमोकळेपणाने गप्पा मारणारे आणि आपुलकीने भेटणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.”सहभागी आहे,” असे सांगितले.

 

कसबा बावड्यात व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली डॉ. डी. वाय. पाटील यांचे कसबा बावड्याशी असलेले ऋणानुबंध यावेळी प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कसबा बावडा परिसरातील अनेक दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवून आपल्या लाडक्या ‘दादां’ना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीयदृष्ट्या हा परिसर सतेज पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी दुःखाच्या प्रसंगी राजकीय भेद बाजूला ठेवून बावडेकरांनी डॉ. पाटील यांच्याप्रती असलेली आपुलकी व्यक्त केली.

 

राज्यभरातून मान्यवरांची उपस्थिती

डॉ. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध पक्षांचे नेते, आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.

 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, सचिन सावंत, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील केदार, बाळासाहेब पाटील, आमदार विश्वजीत कदम, मानसिंगराव नाईक, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विक्रम सावंत, भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आदींनीही शोक व्यक्त केला. कर्नाटकचे माजी मंत्री आर. एम. पाटील, वीरकुमार पाटील, निपाणीचे उत्तमरावसाहेब पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, धार्मिक क्षेत्रातील संत-महंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अरुण डोंगळे, सत्यजित नाना कदम, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख आदींनीही अंत्यदर्शन घेतले.

 

फोनवरूनही श्रद्धांजली

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आनंद महाराज सांगवडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुरुदीप सफल, प्रणव झा, बी. एन. संदीप तसेच अन्य मान्यवरांनी दूरध्वनीवरून शोक व्यक्त करत डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

 

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या भूमीशी घट्ट नाते असलेले, शिक्षणाचा विस्तार बहुजन समाजाच्या दारापर्यंत नेणारे आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य व्यक्तींना आपलेसे करणारे एक अजातशत्रू, दूरदृष्टीचे आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

 

🤙 8080365706