कोल्हापूर: “जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांचा सुपडा साफ करून गडमुडशिंगीत भाजपचा झेंडा फडकवणार,” असा निर्धार जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटातील सलग पंधरा वर्षे मा . ग्रा.प. सदस्य राहिलेले राहुल सूर्यवंशी यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.

कोल्हापूर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रवेश केला.
राहुल सूर्यवंशी यांनी सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजय मिळवत आपल्या प्रभागात विकासकामे आणि जनसंपर्काच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश नसून गडमुडशिंगीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार मानले जात आहे.
यावेळी बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विकासाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
आपल्या भाषणात तानाजी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत जिल्हा परिषद निवडणुकीतील विजय हा जनतेने विकासाला दिलेला कौल असल्याचे सांगितले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्व जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब धनवडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, सजित कांबळे, तानाजी धनवडे , अनिल पाटील,अशोक दांगट, शिवाजी गिरुले,आकराम पाटील, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
