कोल्हापूर:जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्यरक्षणासाठी अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव यावेळी उपस्थितांनी अभिमानाने स्मरण केला.

सदर जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. ओमप्रकाश यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पुष्प अर्पण करून महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राष्ट्रनिष्ठा, अद्वितीय धैर्य आणि स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणाचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजहित व लोकसेवेच्या कार्यात अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेमधील विविध विभागांचे कक्ष अधिकारी, अधीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने भारावून गेले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील, अध्यापिका, मेन राजाराम हायस्कूल यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून देत उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
